पान:महाराजा सयाजीराव आणि मराठी पत्रकारिता.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सामाजिक, आर्थिक, धार्मिक विषयांवर निर्भीड व स्पष्टपणे आपली मते मांडली. शेतकरी, कारागीर, मजूर व शिपाई या वर्गाच्या हितसंवर्धनाचे लेखन सातत्याने केले. स्पृश्यास्पृश्य, जातिभेद, जरठकुमारी विवाह इत्यादी अनिष्ट सामाजिक प्रथांच्या निर्मूलनाची भूमिका घेतली. विठ्ठल रामजी शिंदे जागृतिमधून लिहीत होते. सत्यशोधक ब्राह्मणेतर परिषदांचे अहवाल व वृत्तांत इ. संबंधीचा मजकूरदेखील जागृतिमधून प्रकाशित होत असे.

 बडोद्यासारख्या गुजराथी भाषिक प्रदेशात स्वतंत्र बाण्याने, तत्त्वनिष्ठा, बहुजननिष्ठा व स्पष्टवक्तेपणाशी तडजोड न करता सत्यशोधक विचाराचे पत्र भगवंतराव पाळेकरांनी सलग बत्तीस वर्षे चालवून ध्येयवेड्या पत्रकारितेचा मानदंड निर्माण केला. सयाजीरावांनी बडोद्यात निर्माण केलेल्या निखळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा फायदा जागृतिला झाला. या संदर्भात जागृतिकार भगवंत पाळेकर यांनी नोंदविलेले निरीक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. पाळेकर म्हणतात, “राजकीय दृष्टीने बडोद्याच्या प्रजेला श्रीमंत सयाजीरावांच्या कारकीर्दीत सर्व हिंदुस्थानात डोके वर काढून फिरता येत असे. येथे कोणत्याही पुढाऱ्याच्या येण्याजाण्यावर प्रतिबंध नसे. यासंबंधाने महाराजांचा असा एक हुकूम होता की, बडोद्यातील कोणाच्याही घरी कोणी नामांकित पाहुणा आला तर त्याची खबर ताबडतोब राजवाड्यात पोहोचवावी

महाराजा सयाजीराव आणि मराठी पत्रकारिता / १६