पान:महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 महाराजा सयाजीराव आणि महात्मा गांधी यांच्यातील नात्याचे अचूक विश्लेषण एका प्रसंगावरून करता येईल. एकदा सयाजीराव आणि महात्मा गांधींची गुप्तभेट ठरली. साबरमतीपासून राजवाड्यापर्यंत गांधींच्या गुप्तप्रवासाची सोय महाराजांनी केली. महाराजांनी लक्ष्मीविलास पॅलेसच्या प्रवेशद्वारावर गांधींचे स्वागत करून त्यांना चर्चेसाठी ऐने महालात नेले. सयाजीरावांनी गांधींना आसनावर बसण्याची विनंती केली; पण गांधींनी “बापू, तुमच्यासमोर आम्ही खुर्चीवर बसणं शोभत नाही.” म्हणत भारतीय बैठकीवर बसणे पसंत केले. सयाजीरावही आपली खुर्ची सोडून महात्मा गांधींसमोर जमिनीवर मांडी घालून बसले. होमरूल आंदोलनाने निर्माण झालेला असंतोष दडपून टाकण्यासाठी ब्रिटिश सरकारने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेऊन मार्च १९१९ मध्ये रौलट कायदा संमत केला. त्यानुसार कोणाही भारतीयाला कुठल्याही कारणाशिवाय अटक करण्याचा व देशद्रोहाच्या नावाखाली विनाचौकशी तुरुंगात डांबून ठेवण्याचा, शिक्षेविरुद्ध अपील नाकारण्याचा अधिकार सरकारला मिळाला. कायद्याची अंमलबजावणी फार भयानक पद्धतीने होऊ लागली. कायद्याविरोधात सर्वत्र निषेध सभा घेतल्या जाऊ लागल्या. या कायद्याविरोधात सर्वाधिक मोठे आंदोलन हे गांधीजींनी उभारले. १९१९ साली रौलट ॲक्टमुळे देशभर असंतोषाचा भडका उडाला. बडोद्यातील अमरेली, नवसारी, व्यारा, बडोदा या भागातही ब्रिटिश सरकारविरुद्ध निदर्शने झाली.

महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा / ३६