पान:महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काम करत असल्याचा आरोप ब्रिटिश सरकारने केला. विशेष बाब म्हणजे यापैकी १७ पुस्तिका बडोद्यातील प्रेसमध्ये छापलेल्या होत्या. अरविंद घोष यांच्या 'Which way Freedom?' या इंग्रजी पुस्तकाचा 'वनस्पती नी दवाओं' या नावाने गुजराती अनुवाद केला होता. या पुस्तकात क्रांतिकारकांसाठी काही सूत्रे दिली होती. त्यातील एक सूत्र, “To slay white officials is a merit, not a sin.” म्हणजे, 'गोऱ्या अधिकाऱ्यास मारणे हे पाप नाही, तर ते एक पुण्यकर्म आहे.' ब्रिटिश सीआयडी अधिकारी व्हिंसेंट यांनी या पुस्तकाच्या काही प्रती बॅ. केशवराव देशपांडे राहत होते त्या बंगल्याच्या शेजारच्या विहिरीतून जप्त केल्या.

 व्हिसेंट यांनी नवसारीचे कलेक्टर खासेराव जाधवांची भेट घेऊन अरविंद घोषांच्या 'मुक्ती पथे कौन' पुस्तकाच्या पाचशे प्रती जप्त केल्या असून 'अधिक चौकशीसाठी पोलिसांची मदत देण्याची विनंती केली. तेव्हा खासेराव व्हिसेंट यांना म्हणाले, "महाराजा गायकवाड यांच्या संस्थानात छापा घालायचा परवाना तुमच्याकडे आहे काय? तो अगोदर दाखवा.” खासेरावांची ही भूमिका व्हिंसेंटना चकित करणारी होती. पुढे खासेरावांनी व्हिंसेंटना आपण आमच्या अधिकारावर अतिक्रमण केले, अशी तक्रार गव्हर्नरांकडे करणार असल्याचे सांगितले. यानंतर लगेचच बडोदा सरकारने मुंबई गव्हर्नरांना व्हिसेंटच्या निषेधाचे

महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा / ३४