पान:महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भारतीय गंगनाथ राष्ट्रीय विद्यालय

 अरविंद घोष यांच्या कल्पनेतून आणि सयाजीरावांच्या पाठिब्याने नर्मदाकाठी 'भारतीय गंगनाथ राष्ट्रीय विद्यालया'ची स्थापना करण्यात आली. अरविंद घोष, खासेराव जाधव, केशवराव देशपांडे आणि प्रा. माणिकराव हे या राष्ट्रीय विद्यालयाचे संचालक होते. राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्रवादी विचारांनी प्रेरित झालेले देशभक्त तयार करण्याच्या उद्देशाने १७ मे १९०५ या दिवशी राष्ट्रीय विद्यालयाची सुरुवात झाली. या विद्यालयातील विद्यार्थ्यांना पारंपरिक गुरुकुल आश्रम पद्धतीचे शिक्षण दिले जात असे. सुरुवातीच्या काळात १५ ते २० अविवाहित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. पुढे ही संख्या शंभरपर्यंत गेली. या विद्यालयाच्या माध्यमातून तरुणांच्या शारीरिक विकासासोबत मानसिक विकासास प्रोत्साहन दिले गेले.

 हे विद्यालय रेवाकंठाच्या संस्थानात असल्याने विद्यालय बंद करण्यासंदर्भात ब्रिटिश सरकारने रेवाकंठाच्या राणांवर दबाव आणला. यावर उपाय म्हणून गंगनाथ विद्यालय बडोद्यात सुरू करण्याचा निर्णय संचालक मंडळींनी घेतला. त्यानुसार ऑगस्ट १९०८ मध्ये नर्मदाकाठचे गंगनाथ विद्यालय बडोद्यातील अलकापुरी भागातील काशी विश्वेश्वराच्या मंदिरात सुरू करण्यात आले. १९१०-११ ला या विद्यालयात दत्तात्रय बाळकृष्ण

महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा / २६