पान:महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चिमणाबाईंनी महाराजांना, एवढी साधी गोष्ट आपणाकडून अनवधानाने कशी घडली? अशी विचारणा केली. त्यावर सयाजीराव उत्तरले, “एवढे उन्हाळे, पावसाळे अनुभवले. आम्ही कशी 'चूक करणार? पदोपदी आमची कोंडी करणाऱ्या सत्तेविरुद्ध मनात असंतोष शिगेला पोहोचला होता. शेवटच्या क्षणी मनाने तो कौल दिला आणि आमचे ते स्वाभिमानी वर्तन घडले. " सयाजीरावांचे दरबारातील हे वर्तन ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या संतापातून घडल्याचे स्पष्ट होते.

 दिल्ली दरबारातील सयाजीरावांच्या वर्तनामुळे अनेक वृत्तपत्रांनी त्यांच्याविरुद्ध मजकूर छापायला सुरुवात केली. सयाजीरावांचे मुजरा प्रकरण सर्वत्र गाजू लागले. नामदार गोखल्यांनी प्रकरण गंभीर होत असल्याची सूचना करून जाहीर माफी मागून प्रकरण मिटवण्याची विनंती सयाजीरावांना केली. अखेर स्वतःच्या इच्छेविरुद्ध महाराजांनी माफीपत्रावर सही केली. परंतु महाराजांच्या या निर्णयावर वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये उलटसुलट प्रतिक्रिया छापून आल्या. यावर महाराज म्हणाले, “स्वतः ची बुद्धी गहाण टाकून केवळ दुसऱ्यांच्या आग्रहास्तव या जन्मात मी एक कृत्य केले. ते म्हणजे दिल्ली दरबाराच्या माफीचे होय. गोखल्यांसारख्यांची भीड मला मोडवली नाही, म्हणून मी गोत्यात आलो."

महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा / २५