पान:महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लागले. यावर उपाय म्हणून ब्रिटिश सरकारने सयाजीरावांविरुद्ध ब्रिटिश गुप्तहेरांची नेमणूक करून त्यांच्यावर भारतात आणि परदेश प्रवासात नजर ठेवणे सुरू केले.

 १९०२ मध्ये विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांनी बडोद्यास भेट दिली होती. भगिनी निवेदिता या तत्कालीन भारतातील महत्त्वाच्या क्रांतिकारी नेत्यांपैकी एक होत्या. त्यांचे स्वागत करण्यासाठी बडोदा रेल्वेस्टेशनवर अरविंद घोष आणि खासेराव जाधव हजर होते. भगिनी निवेदिता यांची राहण्याची व्यवस्था महाराजांच्या गेस्ट हाउसवर करण्यात आली. दुसऱ्या दिवशी त्यांनी महाराजांची भेट घेतली. भगिनी निवेदिता यांचे बडोद्यात जाहीर भाषणही झाले.

दिल्ली दरबारातील स्वाभिमानी वर्तन

 १ जानेवारी १९०३ ला इंग्लंडचे बादशहा पंचम जॉर्ज यांच्या राज्यारोहणानिमित्त तत्कालीन व्हॉईसराय लॉर्ड कर्झन यांनी दिल्लीमध्ये दरबाराचे आयोजन केले होते. प्रत्येक संस्थानिकाने या दरबाराच्या अगोदर होणारी मिरवणूक आणि दरबार या दोन्ही कार्यक्रमांना हजर राहावे असे आदेश कर्झन यांनी काढले. परंतु सयाजीरावांनी दरबारापूर्वी होणाऱ्या मिरवणुकीत हजर राहण्यास जाणीवपूर्वक असमर्थता दर्शविली. याचे कारण म्हणजे आदल्या दिवशी हत्तीवरून कर्झन आणि देशी राजांच्या निघणाऱ्या मिरवणुकीत बॉम्ब फेकून कर्झन यांची हत्या करण्याची योजना क्रांतिकारकांनी आखली होती. या योजनेच्या

महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा / २३