पान:महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अडकलेल्या हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी कराव्या लागणाऱ्या क्रांतिकार्याची जनसामान्यांना जणू ओळखच करून देत होते. तसेच काँग्रेसमधील नेत्यांच्या बोटचेपे धोरणावरही अत्यंत मुद्देसूद आणि कठोर शब्दात टीका करण्याचे काम इंदुप्रकाशमधील लेखातून होऊ लागले. अशा जहाल लेखांच्या लेखकाला घेण्याची उत्सुकता बाळ गंगाधर टिळकांना वाटू लागली.

 इंदुप्रकाशमधील हे लेख अरविंद लिहीत आहेत हे सयाजीरावांना माहीत होते. सावळाराम यंदे आणि सयाजीराव यांच्यातील संबंधाशी ब्रिटिश सरकार परिचित होते. त्या जहाल लेखमालेच्या लेखकासंदर्भात सयाजीरावांकडे विचारणा केली असता त्यांनी यावर भाष्य करण्याचे टाळले. अरविंदांची 'न्यू लॅम्प्स फॉर ओल्ड' ही लेखमाला सहा महिने चालली. या लेखमालेनंतर अरविंद घोषांनी प्रसिद्ध बंगाली लेखक बंकिमचंद्र चटोपाध्याय यांच्या वंदे मातरमवर दुसरी लेखमाला सुरू केली.

 बंगालमधील राष्ट्रीय चळवळीस गती देण्यासाठी अरविंद घोषांनी खासेरावांच्या मदतीने एक योजना आखली. या योजनेनुसार १८९८-९९ ला जितेंद्रनाथ बंडोपाध्याय या बंगाली तरुणास खोट्या नावाने बडोदा सेनेत प्रशिक्षणार्थी सैनिक म्हणून भरती केले. बडोदा सेनेत भरती झालेल्या या तरुणास शस्त्र चालविणे, स्फोटकांचा नेमकेपणाने उपयोग करण्याचे प्रशिक्षण दिले गेले. १९०२ मध्ये प्रशिक्षण पूर्ण होताच अरविंद घोषांनी

महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा / १८