पान:महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लागल्याचे दुःख महाराजांना झाले. या प्रकरणामध्ये दिवाण मणिभाईंनी जबाबदारी नीट सांभाळली नसल्याने थोड्याच दिवसांत दिवाणांना बदलण्याचा निर्णय महाराजांनी घेतला.

 सयाजीरावांनी बापटांना सेवेतून मुक्त करताना महिन्याला दीडशे रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेतला. ही बातमी रेसिडेंटना समजल्यावर अस्वस्थ होऊन त्यांनी पुन्हा थयथयाट केला. शेवटी महाराजांनी रेसिडेंटना भेटून स्पष्टपणे सांगितले, “संस्थानच्या अंतर्गत व्यवस्थेत हात घालण्याचा रेसिडेंटना बिलकूल अधिकार नाही.” यावर रेसिडेंटने आग्रह धरला, “संस्थानातील बऱ्यावाईट गोष्टींची माहिती आम्हाला कळवली पाहिजे. हिंदुस्थानात शांतता व सुव्यवस्था नांदावी याबद्दल ब्रिटिश सरकार जबाबदार आहे, त्याअर्थी त्यांना सर्व हकीकती कळविल्याच पाहिजेत." यावर सयाजीराव म्हणाले, “संस्थानात शांतता आहे किंवा नाही यावर देखरेख ठेवणे एवढेच सरकारचे प्रतिनिधी म्हणून तुमचे काम आहे. आमच्या अंतस्थ कारभारात लक्ष घालण्याचे काय कारण आहे?” महाराजांचे हे बोलणे ऐकून रेसिडेंट उच्चारले, “आपले हे बोलणे म्हणजे हिंदुस्थान सरकारच्या अधिराज्याचे जू झुगारून देण्याचा प्रयत्न आपण करत आहात, असा अर्थ आम्ही काढावा का?" ब्रिटिश सरकारच्या हस्तक्षेपास कंटाळलेले सयाजीराव शेवटी म्हणाले, “तुम्ही आम्हाला नोकर समजता काय? काय

महाराजा सयाजीराव आणि भारताचा स्वातंत्र्यलढा / १४