पान:महाराजा सयाजीराव आणि बौद्ध धर्म.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 यातील भट्टाचार्य यांचा 'टू वज्रयान वर्क्स' हा ग्रंथ १९२९ मध्ये प्रकाशित करण्यात आला. या ग्रंथामध्ये तांत्रिक बौद्धवादाचा उगम आणि विकासाचा इतिहास मांडण्यात आला. त्याचबरोबर ज्ञानसिद्धी ग्रंथातील उपदेशाचे महत्व विशद करण्यात आले आहे. 'गुह्यसमाज तंत्र अथवा तथागतगुह्यक' हा भट्टाचार्यांनी संपादित केलेला मूळ संस्कृत ग्रंथ १९३१ साली गायकवाड ओरिएन्टल सिरिजमध्ये सर्वप्रथम प्रकाशित करण्यात आला. भारतातील तंत्र संप्रदायाशी संबंधित साहित्याच्या चिकित्सक अभ्यासातील या ग्रंथाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. इ.स तिसऱ्या शतकातील असंघ या बुद्धोत्तर महायानी पंथातील तत्त्वज्ञाच्या काळात लिहिलेल्या गेलेल्या तांत्रिक बुद्ध वादावरील ग्रंथापैकी हा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. याचबरोबर 'शक्तीसंगम तंत्र' या ग्रंथाचा दुसरा खंड १९४९ मध्ये तर तिसरा खंड १९४७ मध्ये प्रकाशित झाला. 'शक्तीसंगम तंत्र' हा ग्रंथ एकूण ४ खंडांचा होता. या ग्रंथाच्या दुसऱ्या खंडात ‘तारा खंड' हे संस्कृत हस्तलिखित संपादित करण्यात आले. तर तिसऱ्या खंडात 'सुंदरी खंड' हे संस्कृत हस्तलिखित संपादित करण्यात आले. या दोन्ही संस्कृत हस्तलिखितांच्या विविध आवृत्या बडोद्याच्या प्राच्यविद्या संस्थेने बंगालची रॉयल एशियाटीक सोसायटी, नेपाळच्या ढाका विद्यापीठातील दरबार लायब्ररीतून संकलित केले होते.

महाराजा सयाजीराव आणि बौद्ध धर्म / १६