पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण.pdf/११

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उपकरणे, खर्च इत्यादी अडचणी सांगण्यासाठी ते महाराजांना भेटायला आले होते. सयाजीराव निरनिराळ्या लोकांकडून कलावंतांचा पूर्ण तपास केल्याशिवाय कोणाही एकट्यावर विश्वास ठेवत नसत. त्याप्रमाणे या दोघांचाही तपास करून त्यांनी दोघांनाही जमेल तशी मदत केली होती.
 महाराजांशी झालेल्या भेटीत फैजमहंमद खाँ महाराजांना म्हणाले, “मला माझ्या गायन कसबाचा एवढा अभिमान वाटतो, की वाटेल त्या नवशिक्याला पंधरा दिवसांत मी सतार व गायन ह्याची गोडी लावू शकतो.”
 त्यावर महाराजांनी “माझे सेक्रेटरी सरदेसाई ह्यांना गायनाभिरुची लावून द्याल, तर मी तुमचे बोलणं सत्य मानीन, ' असे लगेच फैजमहंमदांना शब्दात अडकवले.

 सरदेसाईंकडे गायन शिकायला वेळ नव्हता. त्यांनी आपले बंधू नारायणराव यांना खाँसाहेबांकडे गाणे शिकायला पाठवले. नारायणराव ठरल्या प्रमाणे फैजमहंमद यांच्याकडे पंधरा दिवस गेले आणि पुढे आ-मरण संगीताभ्यासी बनले. यामुळे महाराजांवर फैजमहंमदांची कायमची छाप पडली. फैजमंहमदांकडे तेव्हा भास्करबुवा बखले, नानांचे बंधू गणपतराव व डॉ. दिनकरराव आणि मुलगा श्यामकांत गायन शिकायला जाऊ लागले. चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके हे बडोद्यात वास्तव्यास असताना उस्ताद मौलाबक्ष खाँ यांच्या गायनशाळेत शास्त्रीय गायन शिकले.

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण / ११