Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचे कलाभवन.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आराखडा आणि शिक्षण पद्धत प्रशंसनीय आहे... या तांत्रिक शाळेत प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींच्या माध्यमातून बडोदा राज्यामध्ये नवीन उद्योग उभा राहिल्याचे मला दिसले. येत्या काही वर्षांमध्ये या उद्योगांना आर्थिक महत्त्व प्राप्त होईल. यामुळे काही वस्तूंसाठी बडोदा युरोपवर अवलंबून असणार नाही. अभियांत्रिकी आणि हस्तोद्योगाच्या क्षेत्रातील कार्य बडोद्यातील जनतेला युरोपियन कामगारांवर अवलंबून राहू न देता स्वावलंबी बनवेल.” जेरेमी डब्ल्यू. जेंकस यांनी वर्तवलेले भविष्य कलाभवनने दोनच वर्षात सत्यात उतरवले. १९०४-०५ या वर्षात कलाभवनच्या कार्यशाळेत तयार झालेल्या एकूण वस्तूंपैकी ५०% वस्तू शासकीय विभागासाठी तयार करण्यात आल्या. यातील ७५% वस्तूंची मागणी एकट्या यांत्रिक तंत्रज्ञान (Mechanical technology ) शाखेकडून पूर्ण करण्यात आली होती.
 देशभरातील विद्यार्थ्यांना अद्ययावत तांत्रिक शिक्षण देणाऱ्या कलाभवनने बडोद्यात आणि बडोद्याबाहेर विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनांमध्ये सहभागी होऊन अनेक बक्षिसे मिळवली. १९०२-०८ या काळात अहमदाबाद, मद्रास, मुंबई, पंढरपूर, बडोदा, सुरत, भावनगर इ. ठिकाणी भरलेल्या प्रदर्शनांमध्ये कलाभवनने ६ सुवर्णपदके, ६ रौप्यपदके व ३ कांस्यपदके मिळवली होती. कलाभवनच्या या 'सर्जनशीलते'चा लाभ भारतातील विविध उद्योगांना झाला.

महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचे कलाभवन / २६