पान:महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 बडोदा सरकारने संस्थानातील बँकिंग व्यवसायाशी संबंधित व्यावसायिक आणि तज्ज्ञ यांच्याशी सातत्याने बँकेच्या स्थापनेसंदर्भात चर्चा केली. बँकिंग तज्ज्ञ आणि सावकारांनी संपूर्ण सहकार्य केल्यास त्यांनी सुचवलेल्या सुधारणा अमलात आणण्यात काहीच अडचण नसल्याचे सयाजीरावांनी स्पष्ट केले. २२ मार्च १९०७ रोजी दिवाण केरशास्प रुस्तुमजी यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात या संदर्भातील आदेश देताना सयाजीराव लिहितात, “समितीने सुचवलेल्या सुधारणासंदर्भातील बडोद्यातील धनवंतांची मते लिखित स्वरूपात घेण्यात यावीत. आवश्यकता वाटल्यास समितीने त्यांच्याशी पुन्हा चर्चा करावी. धनवंत त्यांना योग्य वाटणाऱ्या सूचना सुचवू शकतात.” यानंतर व्हाईटनॅक यांनी हरिभक्ती यांना पुन्हा पत्र लिहून समितीशी झालेल्या विविध लहानसहान मतभेदांकडे दुर्लक्ष करण्याची विनंती केली. त्याचवेळी व्हाईटनॅक यांनी बँकेकडून बडोदा सरकारला देखील कोणताही अतिरिक्त लाभ दिला जाणार नसल्याचे हरिभक्ती यांना स्पष्टपणे कळवले.
 अखेर ५ एप्रिल १९०७ रोजी बँक व्यावसायिक, सावकार आणि तज्ज्ञांनी पत्र लिहून सहकार्य करण्यास तयार असल्याचे बडोदा सरकारला कळवले. याच पत्रात तज्ज्ञांनी बँकेच्या 'बँक ऑफ बडोदा' अशा नामकरणास मान्यता दिली. या पत्रात बँकिंग तज्ज्ञ आणि बडोद्यातील सावकारांनी पुढील मागण्या केल्या होत्या;

महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा / २३