रकमेच्या व्याजातून ग्रंथ प्रकाशनाचे कार्य अव्याहत चालू ठेवले. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम ७० कोटी रु. हून अधिक भरते. तेव्हापासून भाषांतरशाखा नियमितपणे काम करू लागली व तिच्यामार्फत 'श्री सयाजी साहित्य माले' तून विविध विषयांवर पुस्तके प्रसिद्ध होऊ लागली.
१९३१ मध्ये भाषांतर शाखा प्राच्यविद्या संस्थेशी संलग्न करण्यात आली. १९३२ अखेर भाषांतर शाखेसाठी दीड लाख रु. खर्च केले होते. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम ३१ कोटी २१ लाखांहून अधिक भरते. त्याचवर्षी बडोदा कॉलेजच्या प्राचार्यांच्या आग्रहावरून बडोद्यात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. संस्थेतील तीन विद्वानांना पदव्युत्तर शिक्षक म्हणून मुंबई विद्यापीठाने मान्यता दिली. पुढे पीएच. डी. संशोधनासाठी विद्यार्थी प्राच्यविद्या संस्थेकडे येऊ लागले. भाषांतरित ग्रंथांचे प्रकाशन मुख्यतः ६ ग्रंथ मालांमधून केले जात होते. यामध्ये प्रौढांसाठी 'श्री सयाजी साहित्यमाला', किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी 'श्री सयाजी बालज्ञानमाला', ग्रामीण विकासासाठी 'श्री सयाजी ग्रामविकासमाला', महिलांसाठी 'मातुश्री जमनाबाई स्मारक ग्रंथमाला', बालकांसाठी 'श्री शिशुजनमाला' आणि अखेरची 'द महाराजा सयाजीराव मेमोरियल लेक्चर सिरिज' इ.