भट्टाचार्यांनी संपादित केलेला मूळ संस्कृत ग्रंथ १९३१ साली गायकवाड ओरिएन्टल सिरिजमध्ये सर्वप्रथम प्रकाशित करण्यात आला. भारतातील तंत्र संप्रदायाशी संबंधित साहित्याच्या चिकित्सक अभ्यासातील या ग्रंथाचे महत्व अनन्य साधारण आहे. इ.स तिसऱ्या शतकातील असंघ या बुद्धोत्तर महायानी पंथातील तत्त्वज्ञाच्या काळात लिहिल्या गेलेल्या तांत्रिक बुद्ध वादावरील ग्रंथापैकी हा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे.
१९४१ मध्ये ‘शक्तीसंगम तंत्र' या ग्रंथाचा दुसरा खंड तर १९४७ मध्ये याच ग्रंथाचा तिसरा खंड प्रकाशित झाला. हा ग्रंथ एकूण ४ खंडांचा होता. 'शक्तीसंगम तंत्र' ग्रंथाच्या दुसऱ्या खंडात 'तारा खंड' हे संस्कृत हस्तलिखित संपादित करण्यात आले. तर तिसऱ्या खंडात 'सुंदरी खंड' हे संस्कृत हस्तलिखित संपादित करण्यात आले. या दोन्ही संस्कृत हस्तलिखितांच्या विविध आवृत्या बडोद्याच्या प्राच्यविद्या संस्थेने बंगालची रॉयल एशियाटीक सोसायटी, नेपाळच्या ढाका विद्यापीठातील दरबार लायब्ररीतून संकलित केल्या होत्या. १९४९ मध्ये बडोद्याच्या प्राच्यविद्या संस्थेने प्रकाशित केलेला भट्टाचार्य संपादित 'निष्पन्नयोगावली' हा एक महत्त्वाचा ग्रंथ होता. हा मूळ ग्रंथ विक्रमशीला राजवटीतील अभयकर गुप्त या महापंडिताने लिहिला होता. हा ग्रंथ चीनमधील पिपिंग या शहरात मोठ्या प्रमाणावर सापडलेल्या पुतळ्यांचे विश्लेषण करण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास भट्टाचार्य यांनी या ग्रंथाच्या प्रस्तावनेत व्यक्त केला आहे.