पान:महाराजा सयाजीराव आणि दुसरी जागतिक सर्वधर्मपरिषद.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुरू केल्या. मोफत वसतिगृहे उभारली. या शाळांतून संपूर्ण फी माफी करत पाट्या, पुस्तके आणि इतर साधनेही मोफत दिली. पुढे इ.स. १८९२ मध्ये अमरेली प्रांतात आणि इ.स. १९०६ मध्ये संपूर्ण बडोदा राज्यात सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण सुरू केले. परिणामस्वरूप शेकडा ९७ मुले शाळेत जाऊ लागली. पूर्वीपेक्षा शिक्षणाची स्थिती सुधारली. शिक्षणाअभावी पिढ्यानपिढ्या अंधश्रद्धा आणिचालीरीतींचा ओझ्याखाली दबलेल्या समाजाला ऊर्जितावस्था देण्यापासून कार्य करण्यास सुरुवात केली. पुढे शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्यासाठी माध्यमिक, उच्च आणि व्यावसायिक शिक्षणसुद्धा सर्वसामान्यांपर्यंत दारापर्यंत आणले. एकूणच प्रत्येक धर्मातील अविचाराने दबलेल्या प्रजेच्या उन्नतीसाठी कार्य सुरू केले. शिक्षणतज्ज्ञ जे. पी. नाईक यांच्या बडोद्यातील शिक्षणविषयक इ.स. १९४१च्या अहवालानुसार ब्रिटिश हिंदुस्थानच नव्हे; तर इतर संस्थानिकांपेक्षा बडोदा राज्यात शिक्षणाची स्थिती सर्वोत्कृष्ट होती. यांमुळे गरिबी, दारिद्र्याच्या निर्मूलनासाठी अडसर ठरणाऱ्या विचित्र चाली आपोआप बंद झाल्या. प्रजेचा आत्मसन्मान जागा झाला. महाराजांनी एकूणच मानवी उत्कर्षासाठी धर्मातील अडगळ ठरणाऱ्या बाबींना शिक्षणरूपाने तिलांजली दिली.

 सयाजीराव महाराजांच्या संपूर्ण आयुष्यातील वैयक्तिक धर्माचरणाचा साकल्याने विचार केला असता एक बाब प्रामुख्याने लक्षात घ्यावी लागते ती म्हणजे, महाराज वयाच्या

महाराजा सयाजीराव आणि दुसरी जागतिक सर्वधर्मपरिषद / ९