Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि दुसरी जागतिक सर्वधर्मपरिषद.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बारा वर्षांपर्यंत एका खेडेगावात होते. तिथे अस्पृश्यतेचे मोठे अवडंबर माजवले जात नव्हते. सर्व जातीधर्मातील मुले एकत्र खेळत होती. त्यांचे बंधू संपतराव गायकवाड यांच्या आठवणीवरून हे स्पष्ट होते. याचाच प्रभाव त्यांच्या जीवनावर राहिलेला दिसतो. महाराजांचे शिक्षण सुरू असताना वयाच्या १४-१५ व्या वर्षी अहमदाबाद मुक्कामी त्यांनी अस्पृशांच्या हॉटेलमध्ये जेवण घेतल्याची नोंद सापडते. त्यांचे औपचारिक शिक्षण सुरू असताना आणि पुढे त्यांनी गीता, वेद, रामायण आणि महाभारत आणि इतर धर्मग्रंथांचे वाचन मुळातून केले. त्यातील तपशील समजून घेतले. न समजणाऱ्या बाबी त्या-त्या विषयांतील जाणकार व्यक्तींकडून जाणून घेतल्या. राज्यकारभार हाती येताच राजवाड्यातील देवघर, त्यामधील पूजा आणि विधी यात सुधारणा केली. अनुष्ठान आणि दृष्ट काढण्यासारख्या धार्मिक विधींना पायबंद घातला. राजवाड्यातील खंडोबाचे मंदिर सर्वांसाठी खुले केले. धार्मिक विधींचा तपशील 'ऐनेराजमहाल' या ग्रंथात एकत्रित केला. बडोद्यातील दानधर्म आणि पुरोहितांना देण्यात येणारा दक्षिणा काही लाखांवर गेला होता. तो वडीलधाऱ्यांचा रोष न ओढवता टप्प्याटप्प्याने कमी केला. श्रावण महिन्यात देण्यात येणारी दक्षिणा परीक्षा घेऊन देण्यात येऊ लागल्याने त्याचे प्रमाण आपोआपच कमी झाले. परिणामस्वरूप राजवाड्यातील धार्मिक विधीबाबत असणारी कट्टरता कमी करण्यात त्यांना यश आले. तसेच धर्माच्या

महाराजा सयाजीराव आणि दुसरी जागतिक सर्वधर्मपरिषद / १०