पान:महाराजा सयाजीराव आणि दुसरी जागतिक सर्वधर्मपरिषद.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सर्वत्र अनभिज्ञता दिसते. याचा अधिक शोध घेतला असता धक्कादायक माहिती समोर येते. दुसरी जागतिक सर्वधर्मपरिषद त्यानंतर चाळीस वर्षांनी २७ व २८ ऑगस्ट १९३३ रोजी आयोजित केली गेली. या परिषदेचे अध्यक्ष महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याचा सुपुत्र - आधुनिक भारताचे शिल्पकार बडोद्याचे नृपती महाराजा सयाजीराव गायकवाड होते. एखादा राजा सर्वधर्मपरिषदेचा अध्यक्ष होणे ही घटनाच सर्वांना आश्चर्यचकित करणारी आहे. त्यांना हा सन्मान एक सत्ताधीश म्हणून मिळाला की, सर्वधर्माचा अभ्यासू अधिकारी पुरुष म्हणून मिळाला? अशी शंका प्रथमदर्शनी उपस्थित होते. यातील पहिली शक्यता विचारात घेतली असता प्रकर्षाने लक्षात येते की, सयाजीराव महाराज इंग्रजांचे मांडलिक राजा नसून मित्र होते. (लंडनच्या सुप्रीम कोर्टाने इ.स. १९१२ च्या एका खटल्यात सयाजीराव महाराज सार्वभौम राजा असल्याचा अंतरिम निकाल दिला होता.) इंग्रजांचा मित्र म्हणून सयाजीरावांना अध्यक्षस्थान दिले असे म्हणावे तर ही दुसरी जागतिक सर्वधर्म परिषद इंग्रजांनी न भरवता अमेरिकेत आणि पुन्हा शिकागो शहरीच आयोजित केली होती. सयाजीराव महाराजांपेक्षा अधिक प्रबळ सत्ताधीश जगभर असल्याने इंग्रजांचे राज्य असलेल्या देशाचा किंवा इतर कोणत्याही देशांचा सत्ताधीश या सन्मानाचा मानकरी होऊ शकत होता. त्यामुळे सत्ताधीश म्हणून नक्कीच सयाजीराव महाराजांची निवड झाली नाही.

महाराजा सयाजीराव आणि दुसरी जागतिक सर्वधर्मपरिषद / ७