पान:महाराजा सयाजीराव आणि दुसरी जागतिक सर्वधर्मपरिषद.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ओळखण्याची चिकित्सक दृष्टी त्यांच्यामध्ये होती. जगभरातील ‘सर्व धर्मांचे सार एकच आहे' असे फक्त वरवर न सांगता त्या दृष्टीने तुलनात्मक सखोल अभ्यास करण्याची संधी स्वतः घेतली. इतरांना दिली. संशोधित नवनवीन माहिती, ज्ञान फक्त ग्रंथात न ठेवता त्याचे उपयोजन सर्वांपर्यंत जाण्यासाठी उपाययोजना केल्या. धर्माचे मूळ स्वरूप सर्वसामान्य लोकांना कळावे म्हणून पगारी (शासकीय) कीर्तनकार नेमले. सर्वधर्मांचा सखोल आणि चिकित्सक अभ्यास, विविध धर्मांतील जाणकार व्यक्तींशी ठेवलेला सुसंवाद, सर्वधर्मीयांबाबत ठेवलेली सहिष्णुता, धर्मविचार, कार्य, धर्माचरण, जगभर पसरलेली प्रज्ञावंत राजा ही कीर्ती, विविध धर्मांचे परिशीलन आणि विद्वत्तेमुळे निर्माण झालेला धर्मविषयक अधिकार यांमुळे अध्यक्षपदी निवड होणे अपरिहार्य होते.

●●●
महाराजा सयाजीराव आणि दुसरी जागतिक सर्वधर्मपरिषद / २७