आवश्यक असते. अगदी याच न्यायाने त्यांनी बडोद्यातील सार्वजनिक ग्रंथालये वृद्धिंगत केली. नानाविध विषयांवरील पुस्तके भारत आणि जगभरातील तज्ज्ञांकडून निर्माण करून घेतली. जगभरातील अनेक ग्रंथांचे देशी भाषेत अनुवाद करून घेतले. त्यात धर्मशास्त्र, तुलनात्मक धर्म अभ्यासाची पुस्तके कशी काय अपवाद राहतील? विविध साहित्यविषयक मालांतून वेगवेगळ्या धर्माविषयी बहात्तर ग्रंथ मराठीतून, चौसष्ट पेक्षा अधिक ग्रंथ गुजराथीतून प्रकाशित केले. या ग्रंथांना आजही पर्यायी ग्रंथ निर्माण झाले नाहीत. त्यांच्या कार्यकाळात बडोद्यातून जवळजवळ सतराशे ग्रंथ प्रकाशित झाले. ग्रंथ प्रकाशन व्यवहाराबाबत समकालीन आणि त्यानंतरचा कोणताही सत्ताधीस त्यांची बरोबरी करू शकत नाही.
महाराज बाविसाव्या जगप्रवासात लंडनमध्ये असताना दुसऱ्या 'जागतिक सर्वधर्मपरिषदेच्या आयोजकांनी अध्यक्षस्थान स्वीकारण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण दोनदा (ऑगस्ट १९३३चा पहिला आठवडा) दिले. आमंत्रण स्वीकारून महाराजांनी अमेरिकेकडे प्रयाण केले. त्यांना सर्वधर्मपरिषद आणि धर्मसंघ परिषद संयुक्त अधिवेशनाच्या अध्यक्षपदाचा मान देण्यात आला. अमेरिकेत पोहोचताच सरकारकडून महाराजांना मानाचा '२१ तोफांचा गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला. (हा सन्मान फक्त अमेरिकेचे अध्यक्ष आणि पूर्व अध्यक्ष यांनाच देण्यात येत असे.) २७ ऑगस्ट रोजी शिकागोमधील मॉरिसन हॉटेलच्या