पान:महाराजा सयाजीराव आणि दुष्काळ दौऱ्याच्या नोंदी.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आंतरविद्याशाखीय व आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन

 महाराजांचा हा ग्रंथ म्हणजे मानवशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, व्यवस्थापन, शेती, सिंचन, धर्म, तत्त्वज्ञान, संस्कृती अशा विविध १२ ज्ञानशाखांच्या आंतरविद्याशाखीय व्यासंग आणि चिंतनाचे फलित आहे. हा ग्रंथ समजून घेतल्याशिवाय महाराजा सयाजीरावांचे व्यक्तिमत्त्व समजून घेणे केवळ अशक्य आहे. १८८१ ला राज्यकारभार हाती घेतल्यानंतर २० व्या वर्षी हा ग्रंथ प्रकाशित झाला. त्यावेळी महाराजांचे वय ३७ वर्षे होते. महत्त्वाचे म्हणजे राज्यकारभाराच्या पहिल्या दशकातील महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन या ग्रंथात घडते. सामाजिक प्रश्नांची समज, त्यावर उपाय शोधण्याची तत्परता, तात्काळ निर्णय घेण्याची क्षमता, कर्तव्य भावनेच्या पलीकडे जाणारी तळमळ, निर्णयांच्या अंमलबजावणीसाठीचा पाठलाग करण्याची दृष्टी अशा अनेक गुणांची प्रचिती या ग्रंथात पानोपानी येते. ४ डिसेंबर १८९९ ते मार्च १९०० या चार महिन्यांत २१,१७३.१५ चौ.कि.मी. आकाराच्या आणि चार प्रांतात विभागलेल्या आपल्या संस्थानचा दुष्काळ पाहणी दौरा केला. या दौऱ्याचा सर्व तपशील हा ग्रंथ पुरवितो. कर्तव्यदक्ष आणि प्रजेबद्दल कळवळा असणारा प्रशासक कसा असू शकतो याचे दर्शन या ग्रंथात घडते. शिवरायांची परंपरा उन्नत, उत्क्रांत आणि परिपूर्ण करून 'सुराज्य' कसे निर्माण होते याची साक्ष या राजाने या ग्रंथात दिली आहे. शिवरायांचा आदर्श वारसा पुढे नेणारा

महाराजा सयाजीराव आणि दुष्काळ दौऱ्याच्या नोंदी / १०