पान:महाराजा सयाजीराव आणि दादासाहेब फाळके.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

  तेव्हापासून मी लहान लहान कविता खूप लिहिल्या व चारशे- पाचशे लोकांपुढे कीर्तन केलीत. मौलाबक्ष यांच्या गायन शाळेत माझ्या गोड आवाजावर शास्त्रोक्त संगीताचे संस्कार झाले. मला जादूची आवड होती. भाऊसाहेब मुजुमदारांना जादूचे प्रयोग खूप आवडायचे. या इतर कलांच्या मागे लागल्यामुळे माझ्या फोटोग्राफीच्या अभ्यासात खंड पडला. कसेही असले तरी माझ्या जादूच्या प्रयोगांना चांगली दाद मिळाली. हजारो लोकांपुढे मी प्रयोग केले. गज्जर मास्तर इतके खुश झाले की, त्यांनी माझा प्रयोग काही जर्मन प्राध्यापकांसमोर ठेवला. तेसुध्दा प्रयोग पाहून आश्चर्यचकित झाले; पण मला कधीच प्रो. जादूगार फाळके व्हायचे नव्हते. तेव्हा लवकरच मी माझ्या मूळ कामाकडे वळलो.

 थोडक्यात मला सयाजीराव महाराजांची राजधानी बडोद्याने यशस्वी चित्रपट निर्मात्याचा विकास होण्यासाठी ज्या ज्या अंगभूत गुणांची जरूर असते ते मिळवण्यास खूप मदत केली. आज जे माझे वैभव आहे त्याचे श्रेय माझ्या बडोद्याच्या वास्तव्याला आणि तिथल्या कलाभवनच्या तंत्रज्ञानाला आहे. श्री. कॉसीन नावाचे भारत सरकारच्या पुरातन वस्तू शास्त्राच्या खात्याचे मुख्य अधिकारी होते. त्यांनी माझ्या कामात खूप रस घेतला. त्यांनी मला त्यांच्या खात्यात घेण्याचा खूप प्रयत्न केला. यावरून मला पुरातन वस्तूशास्त्र वास्तुविद्या यात किती गोडी होती हे'तुम्हाला'कळेल.

महाराजा सयाजीराव आणि दादासाहेब फाळके / २६