Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि दादासाहेब फाळके.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केलेले श्रीकृष्णजन्म (१९१८) व कालियामर्दन (१९१९) हे दोन्ही चित्रपट अत्यंत यशस्वी ठरले; परंतु या चित्रपटानंतर त्यांचे इतर भागीदारांशी मतभेद सुरू झाले. म्हणून मनःशांतीसाठी १९१९ अखेर सहकुटुंब काशीला निघून गेले. तेथील वास्तव्यात त्यांनी रंगभूमी हे नाटक लिहून त्याची निर्मिती केली; पण त्यास व्यावसायिक यश मिळाले नाही. इ.स. १९२२ मध्ये ते कंपनीत परतले. इ.स. १९३४ पर्यंत हिंदुस्थान सिनेमा फिल्म कंपनीने एकूण ९७ चित्रपट काढले. त्यात फाळके यांनी दिग्दर्शन केलेले ४० चित्रपट होते. त्यांनी या कंपनीकडून दिग्दर्शित केलेला 'सेतुबंधन' हा १९३२ चा शेवटचा चित्रपट होय. व्यवहार विन्मुखतेमुळे त्यांना निष्कांचन अवस्थेत दिवस कंठण्याची वेळ आली, तरीही त्याही अवस्थेत वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी कोल्हापूर सिनेटोनसाठी गंगावतरण (१९३७) हा त्यांचा पहिला आणि शेवटचा बोलपट निर्माण केला आणि निवृत्ती स्वीकारली. भारतीय चित्रपट व्यवसायास २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त १९३२ ला मुंबईतील महोत्सवात कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून फाळके यांना पाच हजार रुपयांची थैली अर्पण करण्यात आली.
भारतीय चित्रपटसृष्टीचे पितामह

 दादासाहेबांनी चित्रपट निर्मितीच्या तंत्राचा अथक परिश्रम करून अभ्यास केला. परिणामस्वरूप १९११-१२ च्या काळात दृष्टिदोष निर्माण झाला; पण चिकाटीने त्यांनी त्यावर मात केली. तत्कालीन भारतीय समाजव्यवस्थेत चित्रपट निर्मिती

महाराजा सयाजीराव आणि दादासाहेब फाळके / २१