वैद्यकीय तपासणी करून आहारासंबंधी काही सूचना केल्या. पॅरिस वास्तव्यात महाराजांनी पंजाब हायकोर्टाचे न्यायाधीश आणि भारतीय कार्यकारी मंडळाचे सदस्य मोहमंद रफीक आणि श्री. इब्राहीम करीम भाई यांना भेटीसाठी बोलविले. लंडनमध्ये ब्रिटिश साम्राज्य असणाऱ्या सर्व प्रांत व देशांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये भारताच्या प्रत्येक विभागाचे स्वतंत्र दालन होते. त्यापैकी एक बडोद्याचेही होते. या प्रदर्शनातील अंतर्गत रस्त्यांची असणारी १५ मैल लांबी या प्रदर्शनाची भव्यता दर्शवते. महाराज आणि महाराणींनी या प्रदर्शनाला पाच वेळा भेट दिली.
महाराणी चिमणाबाई कारमधून लंडनहून येताना रस्सेलच्या स्थानिक बाजारात त्यांचा अपघात झाला. या अपघातात खिडकीच्या काचा महाराणींच्या चेहऱ्यावर लागल्याने तीन-चार जखमा झाल्या. या अपघातानंतर अपघातात गाडीतील लोकांना काचा लागू नयेत अशा पद्धतीने गाड्यांच्या काचांची फिटिंग करण्यात आली. महाराजांसोबत गेलेल्या शिरगावकरांनी लंडनमध्ये ऑईल इंजिनिअरबरोबर कूपनलिका आणि तेल शोध कार्याबद्दल चर्चा केली. काही दिवसांनी महाराजांनी शिरगावकरांना खासगी कारभारी म्हणून काम करण्याची जबाबदारी सोपवून भारतात परतण्याची आज्ञा दिली.
महाराजांनी पॅरिस येथील पाश्चर संशोधन संस्थेला दिलेल्या भेटीवेळी औषध निर्मितीपासून विविध विषांचा उपयोग औषध म्हणून कसा केला जातो याची माहिती करून घेतली.