पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भारतात आल्यानंतर महाराजांनी कायदे कौन्सिलला नागरी व गुन्हेगारी संदर्भातील राज्याच्या कायदेशीर प्रभावक्षेत्राचा युरोप आणि अमेरिकेतील कायदा क्षेत्राशी तुलनात्मक अभ्यास करण्याचा आदेश दिला. याला कर्झन सर्क्युलरचा संदर्भ होता.

 या दौऱ्यात २७ मार्च १९०५ ला ५० विद्यार्थ्यांना संगीत क्षेत्रातील उच्च शिक्षण देता येईल असे विद्यालय सुरु करण्याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे अनाथआश्रमात तंत्रशिक्षण- प्रशिक्षण देण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली. या दौऱ्यातील क्रांतिकारक निर्णय म्हणजे २१ जून १९०६ ला कोलोरॅडो येथून छोटी शहरे आणि खेड्यांमध्ये ग्रंथालये स्थापन करण्याचा आदेश दिला. बडोद्यातील आणि भारतातील ग्रंथालय चळवळीचा हा आरंभ होता. याच दौऱ्यात गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याच्या राज्याच्या धोरणातील त्रुटी दूर करण्यासाठी नवे नियम बनविण्याचे आदेश दिले. याबरोबरच बडोद्यातील हुशार विद्यार्थी अभ्यासासाठी युरोपला पाठविणे, जर्मन व फ्रेंच साहित्याचा अभ्यास करण्यासाठी दोन हुशार विद्यार्थी युरोपला पाठविणे, ग्रंथालयाचा अभ्यास, बागकाम याविषयासाठी तसेच अमेरिकेतील कृषीविज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी विज्ञान विषयाचे दोन विद्यार्थी, अध्यापनशास्त्र, समाजशास्त्र, कला आणि हस्त व्यवसाय, लोहार आणि सुतारकाम, चित्रांची निगराणी करण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी पाठविण्याचे निर्णय या

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ४५