पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

योग्य ती काळजी घ्यालच.' दुसरा संदर्भ म्हणजे महाराजांच्या दैनंदिनीतील उतारा. मे १९०० च्या दैनंदिनीत महाराज लिहितात, 'इतक्या अनिच्छेने यापूर्वी कधीच प्रवासाला निघालो नव्हतो; कारण या वेळेस दुष्काळाने होरपळणाऱ्या माझ्या राज्यातील रयतेकडे मी स्वतः व्यक्तिगत लक्ष द्यायचे सोडून त्यांच्यापासून दूर चाललो होतो. तरीपण मनात थोडे फार समाधान होते की, त्यांच्यासाठी जे काही करायचे त्याची व्यवस्था लावूनच मी जात होतो. पावसाळा सुरू होईल तोपर्यंतच्या काळातील त्यांच्या पोटापाण्याची आणि रोजगाराची तरतूद करून मगच मी प्रवासाला निघालो होतो. '

 या दौऱ्यात महाराजांची मुले आणि भाऊ संपतराव सोबत होते. लंडनमध्ये पोहोचताच महाराणींच्या उपचाराची तातडीने व्यवस्था केली आणि त्यानंतर राजपुत्रांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले. महाराजांना आपल्या सर्व मुलांना इंग्रजी शिक्षण द्यायचे होते. या दौऱ्यात १८ जून १९०० ला महाराजांनी संपतराव गायकवाडांबरोबर प्रिंन्स ऑफ वेल्स यांची भेट घेतली. याबरोबरच ड्युक ऑफ कनॉट आणि लंडनमधील इंडिया ऑफीसचे लॉर्ड जॉर्ज हॅमिल्टन यांचीसुद्धा भेट घेतली. इंग्लंडच्या महाराणीने बकिंगहॅम पॅलेसमध्ये एका संगीत सभेसाठी महाराजांना आमंत्रित केले. याच दौऱ्यात जामनगरचे राजकुमार, प्रसिद्ध क्रिकेटपटू रणजितसिंह महाराजांना भेटले. महाराजांनी त्यांना ७ हजार रु. दिले. या दौऱ्यादरम्यान महाराजांच्या

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ४०