पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या ५८ वर्षातील २८ वर्षे महाराज परदेशात राहिले तर ३० वर्षे भारतात होते. ५८ वर्षे म्हणजे २१ हजार दिवस. त्यापैकी २८ वर्षे म्हणजे १० हजार १७० दिवस महाराज परदेशात राहीले म्हणजे सयाजीरावांनी त्यांच्या कारकीर्दीचा अर्धा कालखंड त्यांनी परदेशात राहून राज्यकारभार केला. भारताच्या इतिहासातील हे एकमेव उदाहरण असावे. राज्यकर्ता प्रत्यक्ष राज्यात असूनही राज्यकारभार सुरळीत चालत नसतो याची कित्येक उदाहरणे आपण पाहिली आहेत. या पार्श्वभूमीवर अर्धी कारकीर्द परदेशात राहून राज्यकारभार करूनही महाराजांनी आपले राज्य सर्वच आघाड्यांवर सर्वोच्च स्थानी ठेवले. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की महाराजांनी व्यवस्थापन, शिस्त, प्रशासनातील कर्तृत्ववान अधिकारी यांच्या जोरावर आपला कारभार चालवला होता.

पहिला प्रवास : १८८७

 महाराजांचा पहिला जगप्रवास इंग्लंड या देशात झाला. ३१ मे १८८७ ला महाराज इंग्लंडला गेले आणि २० फेब्रुवारी १८८८ ला ते भारतात परतले. हा प्रवास ८ महिने २० दिवसांचा होता. या प्रवासाला कुटुंबातील आणि संस्थानातील लोकांचा विरोध होता. कारण हिंदू धर्माप्रमाणे समुद्र प्रवास (परदेश प्रवास) हिंदू धार्मिक मान्यतेच्या विरुद्ध होता. महाराजांच्या सेवेतील अधिकारी, कर्मचारीही महाराजांबरोबर जाण्यासाठी टाळाटाळ

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / २२