पान:महाराजा सयाजीराव आणि जलनियोजन.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करून दिले होते. शेतकऱ्यांना विहिरींसाठी दीर्घ मुदतीची (३० वर्षांपर्यंत) कर्ज दिली जात होती. शेतकऱ्यांच्या सवडीनुसार परतफेडीची सोय होती. त्यामुळे पाण्याच्या बाबतीत बडोदा राज्यातील प्रत्येक व्यक्ती सुखी होता.
 दुष्काळात पाणीपातळी खालावते. प्रजेच्या पिण्याच्या पाण्याचे, शेतीच्या पाण्याचे आणि जनावरांसाठी लागणाऱ्या पाण्याचे खूप हाल होतात. या काळात पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना त्यांनी केल्या. गावागावांतून विंधन विहिरी (बोअर वेल) घेण्यासाठी आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली होती. यामध्येही सयाजीराव महाराजांच्या दूरदृष्टीच्या जलनीतीचे प्रतिबिंब दिसते.

 पिण्याचे पाणी आणि शेतीचे पाणी या खालोखाल जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा होता. दुष्काळात जनावरांच्या पाण्याच्या प्रश्न गंभीर होत होता. यासाठी बडोदा सरकारकडून मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या जात होत्या. जनावरांसाठी चारा छावण्या उभारताना पिण्याच्या पाण्याचीही सोय केली जात होती. यासाठी महाराजांनी वेळोवेळी निधी दिला. त्यांनी हीरकमहोत्सवावेळी जनकल्याणासाठी एक कोटी रुपयांचा निधी उभारला होता. हा निधी बडोदा राज्यातील ग्रामीण भागांसाठी खर्च केला जाणार होता. यातील निधींतून जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी जवळजवळ दोन ते अडीच लाख रुपये निधी खर्च करण्यात आला होता.

महाराजा सयाजीराव आणि जलनियोजन / ११