पान:महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाही. म्हणूनच मराठे जोपर्यंत गंगारामभाऊ आणि सयाजीराव यांची त्यांच्या उन्नतीतील भूमिका समजून घेणार नाहीत तोपर्यंत त्यांना त्यांच्या उत्कर्षाचा 'विकासबिंदू' गाठता येणार नाही.
मराठ्यांसाठी पायाभूत कार्य

 डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनच्या सुवर्णमहोत्सव ग्रंथाचे संपादक सीताराम तावडे यांनी त्या काळातील बहुजन जातीतील जातीनिहाय सामाजिक काम करणाऱ्या संस्थांची पार्श्वभूमी स्पष्ट केली आहे. त्याचप्रमाणे 'बहुजन 'जातीतील अशा सेवाभावी संस्थांना सत्यशोधक चळवळीची पार्श्वभूमी कशी होती हेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर गंगारामभाऊंचे काम विचारात घेतले तर शीर्षकात त्यांना 'मराठ्यांचे महानायक' का म्हटले आहे हे स्पष्ट होईल. तसेच यात जाती अभिमान किंवा जातीय संकुचितपणा नसून त्यांच्या कामाचे वास्तव मूल्यमापन आहे याची प्रचिती येईल. या ग्रंथात तावडे म्हणतात, 'याच वेळी पुण्यात पुढारलेल्या वर्गातील काही पदवीधरांनी न्यू इंग्लिश स्कूल, नेटिव्ह इन्स्टिट्यूट व नूतन मराठी विद्यालय अशा खाजगी संस्था स्थापन केल्या. केसरी, मराठा वगैरे वर्तमानपत्रांनी लोकजागृतीस आरंभ केला. स्वावलंबनाच्या तत्त्वावर काम करण्यास पुढारलेल्या वर्गातील काही तरुण पदवीधर पुढे आले व त्यांच्या प्रयत्नामुळे पुढारलेल्या वर्गात मोठी कर्तव्यजागृती उत्पन्न झाली. याच सुमारास कै. ज्योतीराव फुले, कै. रा. ब. लोखंडे, कै. भाऊ पाटील डुंबरे, कै. कृष्णराव पांडुरंग भालेकर,

महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के / ९