पान:महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नसून सर्व मराठा समाजाचा अप्रत्यक्षरीत्या उत्कर्ष झालेला आहे. अशा रीतीने महाराजांनी मराठा समाजाला चिरकाल उपकारबद्ध करून ठेवले आहे. याची फेड आमच्या समाजाच्या यापुढील कार्यक्षमतेनेच होणार आहे.'
 गंगारामभाऊंच्या डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनचे आणखी एक ऐतिहासिक योगदान म्हणजे पुढे १९०७ मध्ये स्थापन झालेल्या अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या कामाची प्रेरणा गंगारामभाऊ म्हस्के हेच होते. कारण गंगारामभाऊंच्या कामाने मराठ्यांच्या शैक्षणिक विकासाला पहिल्यांदा संस्थात्मक स्वरूप आले. त्याचप्रमाणे गंगारामभाऊंमुळे या कामाची गरज अधोरेखित झाली.
गंगारामभाऊंचे स्मारक

 भारत हा स्मारकांचा देश आहे. भारतातील पुतळे आणि मंदिरे याची मोजणी झाली तर याबाबत भारत पहिल्या क्रमांकावर येईल अशी परिस्थिती आहे. आजही हे दोन मुद्दे भारतात राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. याबाबत तर्क, इतिहास, बौद्धिक प्रेरणा यापेक्षा स्वजात, स्वधर्म अशा भावनिक मुद्याभोवती आपली स्मारके आकार घेत असतात. त्यामुळेच ती प्रेरणास्थाने न होता इतरांचा द्वेष करायला शिकवणारी प्रशिक्षण केंद्रे झाली आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनावर ज्या मराठ्यांचा प्रभाव आहे त्या मराठ्यांच्या महानायकाच्या स्मारकाचा विषय सर्वप्रथम १९३२ मध्ये चर्चेत आला. गेल्या ८८

महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के / २८