पान:महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शेती,दुग्धव्यवसाय, फळबाग, पाणी व्यवस्थापन या विषयांची महत्त्वाची पुस्तके बडोद्यासाठी आणली. त्याबरोबर पारतंत्र्याच्या बेड्या तोडून स्वतंत्र भारताचे स्वप्न घेऊन ते परतले.
बडोद्याच्या कृषी क्षेत्राचे नेतृत्व

 सयाजीरावांनी १८९७ ला खासेरावांच्या नेतृत्वाखाली बडोद्यात कृषी खात्याची स्थापना केली. बडोद्यात शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या ज्या सर्व योजना राबविल्या गेल्या त्याचे सूत्रधार खासेराव होते. बडोद्यात काही वर्षांच्या अंतराने दुष्काळ पडत असे. या दुष्काळावर कायमस्वरूपी उपाय म्हणून 'खासेरावांनी ओरसंग पाणीपुरवठा प्रकल्पाचा आराखडा तयार केला. १९०० मध्ये या ओरसंग पाटबंधाऱ्याच्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणात सयाजीरावांनी या पाणीपुरवठा योजनेच्या कल्पनेचे श्रेय खासेरावांना दिले आहे. सयाजीराव म्हणतात, "आमचे अधिकारी खासेराव जाधवांनी या कामाचा आराखडा तयार केला. त्यांनी आम्हाला सुचविल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. दुष्काळी म्हणून आरंभिलेले हे काम खूप महत्त्वाचे आहे. कारण तात्कालिक मदत देण्याखेरीज या कामाचे स्वरूप कायमस्वरूपाचे उपाय म्हणून मदत होणार आहे.” शेती खात्याचे प्रमुख या नात्याने खासेरावांनी शेतीसाठी विविध योजना यशस्वीपणे राबविल्याचा हा पुरावाच म्हणावा लागेल.

महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव / ९