पान:महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केळूसकरांचे इंग्रजी शिवचरित्र आणि खासेराव
 कृष्णराव अर्जुन केळूसकरांच्या पहिल्या मराठी शिवचरित्राचा इंग्रजी अनुवाद प्रकाशित करण्यामध्ये खासेरावांचे योगदान फार मोठे आहे. खासेरावांचे तत्कालीन अनेक संस्थानिकांशी मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांचा शब्द सहसा कोण डावलत नसे. त्यामुळेच खासेरावांनी विविध संस्थानिकांकडून मोठा निधी या कामासाठी उभा करून दिला. त्यामुळे मराठी आणि बहुजन इतिहासकारा लिहिलेले अत्यंत वस्तुनिष्ठ चरित्र जगभरातील अभ्यासकांना १९२१ मध्ये उपलब्ध झाले. दुर्दैवाने केळूसकरच महाराष्ट्राला फारसे माहीत नसल्यामुळे शिवछत्रपतींचे इंग्रजी चरित्र प्रकाशित होण्यामध्ये योगदान देणाऱ्या खासेरावांची माहिती महाराष्ट्राला कशी होणार? खासेरावांचे महाराष्ट्रातील आणखी एक काम म्हणजे पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामातील सहभाग होय. या स्मारकासंदर्भात मराठा विरुद्ध इतर असा संघर्ष पेटला होता त्यावेळी हा संघर्ष मिटवण्यासाठी ते दोन महिने पुण्यात येऊन राहिले होते. थोडक्यात सर्व मराठी संस्थानिकांमधील आणि प्रमुख मराठा पुढाऱ्यांमधील संवाद निर्माण करण्यासाठी ते आयुष्यभर झटत राहिले.
खासेराव आणि विठ्ठल रामजी शिंदे

 १९२० मध्ये मुंबई इलाख्याच्या कायदे मंडळाच्या निवडणुकीसाठी विठ्ठल रामजी शिंदे उभे होते. त्यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी भरपूर कष्ट घेतले. विठ्ठल रामजी शिंदे यांना

महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव / २५