पान:महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



व त्यांना नोकरी देण्यासंबंधीच्या अनेक योजना तयार केल्या आणि सयाजीरावांनी या योजनांना तत्काळ मान्यता दिली. खासेराव जाधव आर्य समाजाचे प्रधान असताना त्यांनी पोस्ट ऑफिसजवळ आर्य समाज सूर्यनारायण मंदिरास जागा मिळवून दिली. बडोद्यात राजपुत्र फत्तेसिंह आर्य अनाथाश्रम उभारण्यात खासेरावांचा सहभाग होता.
शाहू महाराजांचे मित्र आणि गुरू

 राजर्षी शाहू आणि खासेराव यांच्यातील नाते अत्यंत जिव्हाळ्याचे होते. कित्येक प्रसंगी शाहू महाराज खासेरावांना खाजगी पत्रे लिहून महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करत असत. १९१६-१७ मध्ये सयाजीरावांची नात इंदुमती आणि शाहू महाराजांचे पुत्र राजाराम यांच्या विवाहाची बोलणी सुरू झाली. परंतु ती फारच ताणली गेली होती. त्यावेळी हा विवाह ठरणारच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे खासेराव खूपच अस्वस्थ झाले होते. शाहू आणि सयाजीराव या दोघांचीही मने वळवण्यासाठी त्यांनी खूप धावपळ केली. यामागे या दोन राजांमधील जुन्या नातेसंबंधांना या लग्नाने नवा उजाळा मिळावा ही खासेरावांची तळमळ होती. खासेरावांचे सयाजीराव आणि शाहू या दोघांच्यावर अतूट प्रेम होते. राजर्षी शाहू 'खासेरावांना गुरुस्थानी मानत होते. त्यामुळे खासेराव हा या दोघांना जोडणारा दुवा होता. हा दुवा महाराष्ट्राच्या उत्कर्षाला लाभदायक ठरला असे इतिहास सांगतो.

महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव / २४