पान:महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विकासासाठी अवलंबण्याचे धोरण त्यांनी ठेवले. परदेशात सयाजीरावांनी शेतकऱ्यांच्या पतपेढ्या बघितल्या होत्या. अनेक शेतकरी एकत्र येऊन अशी संस्था स्थापन करतात. त्या पतपेढ्या गरजू शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात अल्पशा व्याजदरात कर्जाऊ रकमा देतात. शेतीमालांची विक्री करण्यासाठीही या संस्था मदत करतात. अशा पतपेढ्या बडोद्यात सुरू करून सावकारांकडून होणारा शेतकऱ्यांचा आर्थिक छळ थांबवावा असे महाराजांना वाटत होते. या कामाची जबाबदारी सयाजीरावांनी खासेरावांवर सोपविली. त्याप्रमाणे खासेरावांनी बडोद्यात शेतकऱ्यांच्या पतपेढ्या सुरू केल्या. शेतकऱ्यांच्या पतपेढ्यांचा प्रयोग भारतात पहिल्यांदा राबविण्याचे श्रेय सयाजीरावांना जाते.

 सयाजीरावांप्रमाणेच खासेरावही परदेशातील उत्तम गोष्टींच्या अनुकरणास प्रोत्साहन देत असत. खासेराव लंडनमध्ये शिकत असताना त्यांना जर्मनीतील शिक्षणसंस्था बघण्याची संधी मिळाली. एकाच संस्थेत असणारी वेगवेगळ्या तांत्रिक शिक्षणाची सोय खासेरावांना विशेष आवडली. अशा प्रकारची संस्था बडोद्यातही असावी असे त्यांना वाटू लागले. या संदर्भातील एक आराखडा तयार करून खासेरावांनी सयाजीरावांकडे पाठविला. खासेरावांची ही योजना महाराजांनाही आवडली. त्यानुसार बडोद्यात १८९० मध्ये दहा विद्यार्थ्यांसह 'कलाभवन' या तांत्रिक शिक्षण संस्थेची सुरुवात झाली. त्यावर प्रो. गज्जर यांची प्राचार्य म्हणून नेमणूक केली. या कलाभवनमध्ये पुढे

महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव / ११