पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संदर्भ समजून घेणे येथे महत्त्वाचे ठरेल. कारण आजपर्यंत हा महत्त्वाचा संदर्भ अंधारात राहिला आहे. केळुसकरांचे १९०७ चे हे शिवचरित्र त्यांनी शाहू महाराजांना अर्पण केले होते. या शिवचरित्राबद्दल शाहू महाराजांनी केळुसकरांना १ हजार रु. ची मदत तर दिलीच परंतु या पुस्तकाच्या ५०० प्रतीही विकत घेतल्या. शाहू महाराजांनी पुढे १२ ऑक्टोबर १९२० रोजी क्षात्रजगद्गुरू पदाच्या निर्मिताचा जो जाहीरनामा प्रकाशित केला त्यामध्ये या पुस्तकाचा संदर्भ घेतला होता. तो संदर्भ फारच ऐतिहासिक आहे. या जाहीरनाम्यात 'रामदास किंवा दादोजी कोंडदेव हे श्री शिवाजी महाराजांचे गुरू होते, ही क्लृप्ती ब्राह्मणांचीच आहे त्याबद्दल इतिहासात कोठेच सबळ पुरावा नाही' अशी भूमिका मांडली आहे. केळुसकरांनी १९०७ मध्ये सर्वप्रथम वरील शिवचरित्रात हे पुराव्यानिशी मांडले होते. केळुसकरांची ही भूमिका उद्धृत करणारे शाहू महाराज हे पहिली व्यक्ती आहेत.
 सामाजिक शास्त्रात जगातील अभ्यासकांना सर्वात मोठे आव्हान देणारी संकल्पना जात हीच आहे. त्यामुळे आपल्याकडील संशोधकांना जातीचे सर्व पदर बारकाव्याने समजून घेतल्याशिवाय आपल्या सामाजिक समस्यांचे पूर्ण आकलन करून घेता येणार नाही. दुर्दैवाने आपले संशोधक 'आपण जातीयवादी ठरू' या भीतीतून जातीचा उल्लेख समाज असा करतात. उदाहरणार्थ मराठा समाज. जात ही संकल्पना

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / ५३