पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या ग्रंथाचे काम चालू असताना केळुसकरांच्या आई आजारी पडल्यामुळे त्यांना गावी जावे लागले. करारानुसार ग्रंथाचे काम सहा महिन्यांत पूर्ण करणे बंधनकारक होते. परंतु मुदत संपेपर्यंत केळुसकरांचे अर्धेच काम पूर्ण झाले होते. मुदतीच्या अटीतून मुक्त होण्यासाठी केळुसकरांनी ग्रंथाचा तयार झालेला भाग बडोद्याच्या विद्याधिकाऱ्यांकडे पाठवून 'उर्वरित भाग पूर्ण झाला असून त्याची नक्कल झाल्यावर पाठवून देत असल्याचा' निरोप दिला. त्यानुसार दोन महिन्यांत केळुसकरांनी राहिलेले काम पूर्ण केले.
 उर्वरित काम विद्याधिकाऱ्यांकडे पाठवून दिल्यानंतर केळुसकरांनी भानू गांगनाईक यांना पत्र पाठवून ग्रंथाविषयी परीक्षण समितीचे मत काय आहे याची माहिती काढून कळविण्यास सांगितले. परंतु गांगनाईक यांनी केळुसकरांच्या पत्राला वेडेवाकडे उत्तर पाठविले. गांगनाईक यांनी रागाने आणि द्वेष भावनेने वेडेवाकडे उत्तर पाठवले असावे असे वाटल्यामुळे केळुसकरांनी या संदर्भात बडोद्याचे विद्याधिकारी कालेलकर यांना पत्र पाठवले. या पत्रात केळुसकरांनी गांगनाईकांची तुलना 'इसापनीतीतील कोठंब्याच्या कुत्र्या'शी केली होती. विद्याधिकारी कालेलकरांनी केळुसकरांचा विश्वासघात करून त्यांनी पाठवलेले हे पत्र गांगनाईक यांना दाखवले. पत्र वाचून रागावलेल्या गांगनाईकांनी केळुसकरांना कायदेशीर नोटीस पाठवतानाच माफी न मागितल्यास खटला चालवण्याचीदेखील धमकी दिली.

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / २७