पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मराठ्यांच्या सांस्कृतिक अवनतीचे एक महत्त्वाचे कारण आहे." हे भाषांतर बडोद्यातील ब्राम्हणांच्या कारस्थानांना तोंड देत केले होते असे केळुसकरांच्या चरित्रावरून दिसते.
सेनेका आणि एपिक्टेटस यांची बोधवचने
 रोमनकालीन स्टोइक तत्त्वज्ञ सेनेका आणि एपिक्टेटस यांच्या विचारांचा स्टोइक तत्त्वज्ञानाबरोबरच युरोपमधील अनेक तत्त्ववेत्त्यांवर मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडल्याचे आपल्याला दिसते. ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या काळात देवळांमधून लोकांना उपदेश करणारे धर्माधिकारी सेनेका आणि एपिक्टेटस यांच्या ग्रंथांच्या आधारे आपली बोधपर व्याख्याने तयार करीत असत. अशा या तत्त्वज्ञांच्या तत्त्वज्ञानाचा आपल्या संस्थानातील जनतेला परिचय व्हावा या उद्देशाने सयाजीरावांनी 'सेनेका आणि एपिक्टेटस यांची बोधवचने' या ग्रंथाच्या भाषांतराचे काम केळुसकरांना दिले. ग्रंथांच्या भाषांतराचे मानधन म्हणून केळुसकरांना १००० रु. देतानाच हे भाषांतर ६ महिन्यात पूर्ण करण्याचा आदेश सयाजीरावांनी दिला. महाराजांच्या या आदेशानुसार केळुसकरांनी ग्रंथाचे भाषांतर वेळेत पूर्ण केले.
शंकर मोरो रानडे आणि भानू गांगनाईक यांच्याकडून झालेला त्रास
'सेनेका आणि एपिक्टेटस यांची बोधवचने' ग्रंथाच्या भाषांतरावेळी केळुसकरांना शंकर मोरो रानडे आणि भानू गांगनाईक यांच्याकडून झालेला त्रास धक्कादायक होता.

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / २६