पान:महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

क्रांतिकारक उपक्रम १९३७ पर्यंत पूर्णत्वास नेला होता. याचा बोलका पुरावा म्हणजे १९३६-३७ मध्ये बडोदा संस्थानात अस्पृश्य विद्यार्थ्यांची संख्या २०,९३३ होती. विशेष म्हणजे अस्पृश्यांच्या शाळेत शिकणाऱ्यांची संख्या ४,५३५ होती. तर मिश्र शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अस्पृश्यांच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ४ पट म्हणजेच १६,३९८ इतकी होती. ही भारतातील शैक्षणिक क्रांतीच होती. भाऊरावांची प्रेरणा सयाजीराव असल्यामुळे पहिल्या हायस्कूलला त्यांनी सयाजीरावांचे नाव दिले.
 अजून एक या प्रसंगाशी जुळणारी बाब येथे विचारात घ्यावी लागते ती अशी की, २२ सप्टेंबर १९१७ ला शाहू महाराजांनी सयाजीरावांना पत्र लिहून 'माझ्या जीवनकाळात माझ्या संस्थानात मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्याचे उद्दिष्ट साध्य करणे हे माझे जीवनध्येय आहे आणि याबाबत मी तुमच्या पाऊलावर पाऊल टाकून वाटचाल करत आहे' असे कळवले होते. १९१९ पासून शाहू महाराजांनी सक्तीच्या व मोफत प्राथमिक शिक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी कोल्हापूर संस्थानात सुरू

केली.त्याच वर्षी पुण्यासह दक्षिण महाराष्ट्रात हा कायदा व्हावा म्हणून जनआंदोलन गतिमान झाले होते. या आंदोलनात विठ्ठल रामजी शिंदे यांचा महत्त्वाचा वाटा होता. सातारा जिल्ह्यात या आंदोलनाचे नेतृत्व कर्मवीर अण्णा करत होते.

महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील / २७