पान:महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 एकसंध समाजनिर्मितीसाठी प्रयत्नरत भाऊरावांचे छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊसच्या माध्यमातून चाललेले जातीनिर्मूलनाचे काम पाहून सयाजीराव खुश झाले. या भेटीप्रसंगी भाऊरावांच्या प्रयत्नांचे महत्त्व विशद करताना सयाजीराव म्हणतात, "हिंदुस्थानच्या प्रगतीस लागलेल्या अत्यंत जालीम जाती विशिष्टरूपी किडीच्या मुळावरच रा. भाऊराव यांनी कुन्हाडीचा घाव घातल्यामुळे ती या बोर्डिंगच्या व्यवस्थेमुळे मुळातूनच नष्ट होणार आहे. असे बोर्डिंग व याची तत्त्वे अमलात आणण्याची रीत हिंदुस्थानात कुठेच दिसून येत नाही.” सयाजीरावांना भाऊरावांचा सर्व जातीधर्माच्या विद्यार्थ्यांसाठी एकत्र वसतिगृहाचा यशस्वी प्रयोग पाहून झालेला आनंद महत्त्वाचा होता. कारण सयाजीरावांनी त्यांच्या संस्थानात स्पृश्य अस्पृश्य सहशिक्षणाचा प्रयोग यशस्वी केला होता.

 याचे उत्तम उदाहरण म्हणजे १९३३ मध्ये ज्यावेळी सयाजीराव भाऊरावांच्या वसतिगृहाला भेट देत होते. त्याचवर्षी बडोद्यातील अस्पृश्य शाळेतील विद्यार्थी संख्या ४,७७५ होती तर स्पृश्य अस्पृश्य मिश्र शाळेतील विद्यार्थांची संख्या १६,२७९ इतकी होती. म्हणजेच अस्पृश्य शाळेतील विद्यार्थी संख्येच्या चार पट विद्यार्थी संख्या बडोद्यातील मिश्र शाळेत होती. महाराजांच्या बडोद्यातील प्रयोगाच्या यशाचा पाठलाग करणारा भाऊरावांचा वसतिगृहाचा हा यशस्वी प्रयोग पाहून महाराजांइतका आनंद कोणाला होऊ शकतो. याउलट सयाजीरावांच्या कार्याबद्दल

महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील / २१