पान:महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आभार :
 ११. रा. भाऊराव यांनी चालविलेल्या या उत्कृष्ट संस्थेची दिवसेंदिवस भरभराट होवो व तिच्यासारख्या अनेक संस्था देशभर पसरून त्यातून खरे देशहित साधणारे आर्यभूंचे सुपुत्र बाहेर पडून आपल्या देशाचा उद्धार होवो अशी इच्छा प्रदर्शित करून रा. भाऊराव यांनी ही उत्कृष्ट संस्था पाहण्याची मला जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानून मी आपले भाषण पुरे करतो.
विद्यार्थांसोबत जेवण
 दुपारच्या जेवणाची वेळ टळून गेली असल्याने भाऊरावांनी महाराजांना विचारले, “मुलांचं जेवण तयार आहे. श्रीमंतांनी सुदाम्याघरचे पोहे...”

 महाराज पटकन म्हणाले, “माझ्यासाठी वेगळं काही करू नका. मुलं दुपारी जे जेवणार तेच आणा. " भाऊरावांनी झुणका भाकर वाढून आणली. महाराजांनी हातात भाकरी घेतली. त्यावर झुणका घेऊन ते उभ्या उभ्या आनंद घेऊ लागले. झणझणीत झुणक्याने महाराजांस ठसका लागला. त्यांनी पाणी मागितले, बरोबरच्या डॉक्टरांनी पाणी पिऊ नका म्हणून नम्र विनंती केली. भाऊरावांनी एका पोराला खूण केली. पोरगा तुरुतुरु बाजूच्या नारळाच्या झाडावर चढला. दोन-तीन शहाळे तोडून खाली टाकले. एक फोडून ते पाणी महाराजांस पिण्यास दिले. महाराज पुन्हा झुणका भाकरी आनंदानं खाऊ लागले आणि ते कवळाण्याच्या आपल्या गावी मनाने जाऊन पोहोचले.

महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील / २०