पान:महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहेत की नाहीत आणि मरणानंतर स्वर्ग मिळतो की नाही, हे प्रश्न फार गूढ व वादग्रस्त असून त्यांचा निर्णय ज्याने त्याने आपल्या बुद्धीप्रमाणे करावा. मी या बाबतीत जो विचार केला आहे, त्यावरून तरी माझे असे ठाम मत झाले आहे की, स्वर्ग व नरक मरणानंतर नसून येथेच या जगांत आहेत. आपण आपल्या कर्मा येथेच स्वर्ग मिळवितो किंवा येथेच नरकात जातो. मरणानंतर स्वर्ग मिळविण्याची हाव धरण्यापेक्षा येथेच स्वर्ग मिळविण्याची महत्त्वाकांक्षा धरणे अधिक शहाणपणाचे नाही का?
सर्व जातीत ज्ञानप्रसार होण्यानेच खरी सुधारणा होईल :

 ७. आज आपण सर्वजण कृत्रिम अडचणी उत्पन्न करून कष्ट सोशीत आहोत. मागला इतिहास पाहा किंवा आजचाही पहा. वेदोक्त प्रकरण, ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद, हे अगदी निरर्थक होते. ते कृत्रिम अडचणींमुळे उत्पन्न झाले. या सर्व कृत्रिम अडचणी आणि सवयीमुळे बनलेल्या घातक समजुती ज्ञानप्रसारानेच नष्ट होतील, म्हणून समाजातल्या सर्व जातीत सारखा ज्ञानप्रसार केला पाहिजे. मात्र जुलुमाने लोकांची मते बदलण्याचा प्रयत्न निष्फळ होईल. आरंभी त्यांच्या कलानेच घेतले पाहिजे. माझ्या संस्थानात आमचे मराठे सरदार प्रथम इतर जातींबरोबर कसलाही अन्य व्यवहार करण्यास तयार नसत. पण मी त्यांच्यावर कधी सक्ती केली नाही. धर्मसमजुती जुलुमाने बदलणे शक्य नाही,हे जाणून मी सर्व जातींमध्ये ज्ञानप्रसाराचा उपक्रम सुरू केला.

महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील / १७