पान:महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



करा, तुम्ही इतिहासाकडे पाहिले तर तुम्हास असल्या खोट्या समजुतींमुळे समाजात भेद उत्पन्न होऊन देशाचे व समाजाचे किती नुकसान झाले आहे, हे दिसून येईल.
खरा धर्म म्हणजे समता :
 ५. आपल्यातल्या या अनेक जाती, धर्म व त्यामुळे उत्पन्न होणारे तंटे व देशाची तदुत्पन्न हानी या गोष्टी पाहिल्या म्हणजे मला तर असे वाटू लागते की, महंमद पैगंबरांचे अनुकरण करून, त्यांनी ज्या दिशेने एकी करण्याचा प्रयत्न केला त्या दिशेने आपण प्रयत्न करण्याचा काळ खचित आला आहे. सर्वत्र समता प्रस्थापित करून त्या काळी महंमद पैगंबराने खरोखरच फार महत्त्वाचे व मोठे कार्य केले, मनुष्यमात्र सर्व एक असून त्याचा दर्जा त्याच्या गुणांवरच ठरला पाहिजे. ज्याच्यांत गुण असेल तोच विद्वान व ब्राह्मण-मग त्याचा जन्म अंत्यज कुलांत झालेला असला तरी हरकत नाही, त्याला आपण मान दिला पाहिजे. जो शौर्य दाखवील तो क्षत्रिय मग तो जन्माने ब्राह्मणही असेल. सर्व मनुष्यांना सम लेखून, ज्याला त्याला त्याच्या गुणांप्रमाणे पुढे येण्यास संधी देणे हाच खरा धर्म.
स्वर्ग व नरक येथेच आहेत :

 ६. आपण स्वर्ग मिळण्यासाठी धर्म पाळतो. पण आज आपण धर्म म्हणून पाळत असलेल्या आचारांनी आपल्यास स्वर्ग खरोखरच मिळत असेल काय? स्वर्ग व नरक खरोखरच

महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील / १६