पान:महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 “महाराज, आपण गुणांचे चाहते आहात म्हणून आपल्या सभोवार गुणी माणसे आपणाकडे आकर्षून येतात. आमच्या जिल्ह्यांतील एक अमूल्य हिरा मे. रामचंद्रराव माने पाटील हे आपल्याकडे आहेत. आपल्या अंगी काय जादू असेल ती असो मे. माने पाटील हे अत्यंत राजनिष्ठ असून त्यांची आपणावर अप्रतिम भक्ती आहे असे माझ्या अनुभवास आले आहे. मुंबई इलाख्यातील दिवाणपद त्यांना प्राप्त व्हावे अशी सर्व सातारा जिल्हानिवासीयांची इच्छा असल्यामुळे या जिल्ह्यातर्फे त्यांनी काउन्सिल निवडणुकीकरिता उभे राहण्यास यावे अशाबद्दल निमंत्रण करण्यास मी बडोद्यास गेलो होतो, तेव्हा त्यांनी मला स्पष्ट सांगितले की, “भाऊराव, मी सयाजीराव महाराजांचे पाय सोडणार नाही.” मी त्यांना पुनः पुनः विनंती केली तरी त्यांच्याकडून तेच उत्तर मिळाले, अशा प्रकारचा कार्यक्षम नेता आपण आपल्या येथे गुंतवून ठेवला यामुळे आपल्या जिल्ह्याचे अपरीमित नुकसान झाले आहे हे सांगण्यामध्ये मी काही तक्रार करीत नाही. परंतु गुणी माणसांची निवड करून त्यात स्वामिनिष्ठ करून ठेवण्याची आपली हातोटी उत्कृष्ट आहे, हे सांगण्याचा माझा हेतू आहे.

 शेवटी माझ्या कार्यास येथील प्रसिद्ध पुढारी रा. वा. काळे व रा. रा. दादासाहेब करंदीकर यांची सहानुभूती असून ते मला पूर्ण मदद करतात, त्याचा उल्लेख महाराज जाहीर रीतीने आपणासमक्ष करून, पुन्हा एक वेळ आपण आपला अमूल्य वेळ खर्च करून

महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील / १३