पान:महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राज्यकारभार हाती घेतला तेव्हा फक्त ५९ किलोमीटर इतकाच रेल्वेचा विकास झाला होता, तर सयाजीरावांचे महानिर्वाण झाले त्यावर्षी म्हणजेच १९३९ मध्ये ५९ किलोमीटर असणाऱ्या रेल्वेचा विकास ९०० किलोमीटरवर गेला. म्हणजेच उद्योगधंद्यांच्या विकासासाठी निर्णायक ठरणाऱ्या सुविधेत १५ पट वाढ झाली. रेल्वेचा असा विकास सयाजीरावांच्या समकालीन कोणत्याही संस्थानात झाला नव्हता. थोडक्यात उद्योगधंद्यांच्या विकासासाठी दळणवळण, वीज, पाणी आणि जमीन या बाबी उद्योगांना कमी त्रासात आणि कमी दरात उपलब्ध करून देण्याचे धोरण आजही भारतासाठी मॉडेल ठरावे इतके वेगळे होते.
बडोद्यातील औद्योगिक स्थितीची पार्श्वभूमी

 आधुनिक उद्योगांच्या स्थापनेपूर्वी बडोद्यातील लघु उद्योगांनी जवळपास १८% लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. बडोद्यातील काही शहरे त्यांच्या विशेष उत्पादनांसाठी फार प्रसिद्ध होती. यातील प्रमुख म्हणजे पटोलांसाठी पाटण; पितळ व लाकडाच्या कामासाठी विसनगर; घरगुती वापरासाठी आवश्यक असणाऱ्या चाकू, चमचे, कात्री यासारख्या वस्तूंसाठी कडी आणि पाटण; शिंगे आणि लाखेच्या कामासाठी सानखेडा; लाकूड - कोरीव कामांसाठी नवसारी; रेशीम आणि सोन्याच्या धाग्याच्या उद्योगासाठी बडोदा आणि पाटण; रंगकाम व छपाईसाठी पाद्रा, काठोर आणि नांदोड; जहाज बांधणीसाठी

महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास / ७