उद्योग विकासाचे 'सयाजी मॉडेल'
भारतातील औद्योगिक क्रांतीची पायाभरणी करण्याचे ऐतिहासिक कार्य महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी केले. १८८१ ला त्यांनी राज्यकारभार हाती घेतल्यानंतर १८८२ ला सूतगिरणी सुरू करून बडोदा संस्थानात उद्योगाची पायाभरणी केली. १८८५ मध्ये गणदेवी सहकारी साखर कारखाना सुरू करून भारतातील कृषी-औद्योगिक समाज रचनेचा पाया घातला. १८८८ मध्ये टी. के. गज्जर यांच्याकडून औद्योगिक शिक्षणाचे धोरण तयार करून घेऊन १८९० मध्ये कलाभवन ही औद्योगिक व तांत्रिक शिक्षणाची जागतिक मान्यता असणारी संस्था सुरू केली. येथे सर्व जाती धर्माच्या लोकांना तांत्रिक शिक्षण आणि विशेषत: अस्पृश्य, कारागीर व आदिवासींना मोफत औद्योगिक शिक्षण देऊन नव्या समतावादी समाजरचनेचा पाया घातला.
संपूर्ण बडोदा संस्थान रेल्वेने जोडण्याच्या उद्देशाने ९०० कि. मी. चा रेल्वेमार्ग विकसित केला. तसेच सर्व संस्थान पक्क्या रस्त्याने जोडले. संस्थानच्या मालकीची जलविद्युत निर्मिती संस्था स्थापन केली. ओखाबंदर सारखे बंदर विकसित करून व्यापार उद्योगाला रचनात्मक चालना दिली. प्रत्येक जिल्ह्याला एक औद्योगिक शाळा, महिलांसाठी तांत्रिक शिक्षणाची सोय केली. 'बँक ऑफ बडोदा' स्थापन करून औद्योगिक विकासाला भक्कम पाया दिला. भारतातील तत्कालीन ५६० संस्थानांमध्ये