पान:महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



ओखा मीठ उद्योग
 बडोदा संस्थानच्या किनारपट्टीवर ओखामंडल येथे उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक मिठावर प्रक्रिया करून शुद्ध मीठ उत्पादन करण्याच्या उद्देशाने ५ मे १९२७ रोजी ओखा सॉल्ट वर्क्सची स्थापना करण्यात आली. या कारखान्यात उत्पादित होणारे मीठ बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्यात केले जात असे. सयाजीरावांच्या दूरदर्शी धोरणामुळे अल्पावधीतच या उद्योगाची भरभराट झाल्याचे आपल्याला खालील आकडेवारीवरून लक्षात येते.

 उद्योगाच्या स्थापनेनंतर ५ वर्षातच मिठाचे उत्पादन ३४,८५९ टनावर पोहोचले. बंगाल प्रांत हा या उद्योगात उत्पादित होणाऱ्या मिठाचा प्रमुख ग्राहक होता. १९३२-३३ मध्ये एकूण उत्पादनापैकी ३४,६७३ टन मीठ बंगालमध्ये निर्यात केले गेले. त्यामुळे उद्योगाकडील मिठाचा केवळ ४० टन इतकाच राखीव साठा राहिला. १९३४-३५ मध्ये एकूण ६३,९५० टन मिठाचे उत्पादन या उद्योगात झाले. त्यापैकी ५९,७८३ टन मीठ बंगालमध्ये निर्यात करण्यात आले. पुढील वर्षी १९३५-३६ मध्ये मिठाच्या उत्पादनात घट होऊन ४४,३७० टन मीठ उत्पादित झाले. तर या वर्षी बंगालमध्ये ३८,९११ टन मीठ निर्यात केले. १९३८- ३९ मध्ये मिठाचे उत्पादन आणि बंगालमधील निर्यात अनुक्रमे ३३,७१७ टन व ३७,२६२ टन इतके होते. १९३२-३३ ते १९३८- ३९ या कालावधीत ओखा सॉल्ट वर्क्स मधील मीठ उत्पादनात सातत्याने चढ-उतार झाल्याचे दिसून येते.

महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास / ४०