पान:महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



भरतकाम, विणकाम, लेस तयार करणे असे कौशल्याधारित प्रशिक्षण दिले जात असे. तसेच मसाले, मुरांबे, लोणची, फराळाचे पदार्थ स्त्रियांकडून तयार करून घेतले जात होते. १९३८ मध्ये स्त्री उद्योगालयाच्या इमारतीसाठी सर सयाजीराव डायमंड ज्युबिली फंडातून ३०,००० रुपये देणगी देण्यात आली. ही रक्कम आजच्या रुपयात ४ कोटी ४९ लाखांहून अधिक भरते.

 १९३९ मध्ये स्त्री उद्योगालयाने डिप्लोमा परीक्षेसाठी येणाऱ्या खेड्यातील स्त्रियांसाठी वसतिगृहाची सोय केली. दरवर्षी जवळजवळ २०० स्त्रिया या उद्योगालयात प्रवेश घेत असत. ज्या स्त्रियांनी घरगुती उद्योग व व्यवसाय सुरू केले होते त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांनी तयार केलेल्या विविध वस्तू जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराजांनी अशा वस्तूंच्या प्रदर्शनांचे आयोजनही केले होते. समाजाला प्रगतीकडे घेऊन जाण्याचे क्रांतिकारक धोरण राबवताना सयाजीरावांचे पारंपरिक मानसिकतेवर थेट हल्ला न करता हळूहळू समाजाला या पारंपरिक मानसिकतेतून बाहेर काढण्याचे कौशल्य चकित करणारे होते. स्त्रियांना उद्योगात आणताना त्यांच्यावरील पारंपरिक धार्मिक प्रवाहाचा विचार करून सयाजीरावांनी हिंदू स्त्रियांसाठी 'बटर' व 'तूप' तर मुस्लिम महिलांसाठी 'कुक्कुटपालन' यासारख्या व्यवसाय उद्योगांना पाठबळ दिले. यातून महाराजांच्या सर्वसमावेशक दृष्टीची प्रचिती येते.

महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास / ३३