पान:महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



७) नैसर्गिक संसाधनाचे अन्वेषण
 सयाजीरावांनी बडोद्यात आढळणाऱ्या नैसर्गिक संसाधनाचे सखोल अन्वेषण करून घेतले. काही नैसर्गिक संसाधनाचे अन्वेषण पुढीलप्रमाणे करण्यात आले. ज्यांच्याआधारे नवीन उद्योगाची स्थाननिश्चिती करण्यासाठी उचित मार्गदर्शन मिळाले. परिणामी नव्याने स्थापन होणारे उद्योग अपेक्षित यश संपादन करू शकले.
(i)सिमेंट
 द्वारका आणि पेलाण या ठिकाणी सापडणाऱ्या मातीचे सिमेंट निर्मितीसाठीची उपयुक्तता तपासण्यासाठी इंग्रज सिमेंट तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली. द्वारका येथील चिकनमाती- सिमेंट निर्मितीसाठी उपयुक्त असल्याचा अहवाल आल्याबरोबरच भाडेपट्टी करार मंजूर करण्यात आला. १९२१ मध्ये द्वारका येथे सयाजीरावांनी पश्चिम भारतातील सर्वात मोठा सिमेंट निर्मिती कारखाना सुरू केला.
(ii) मासेमारी

 सिलोन श्रीलंका येथील मोती बँकेचे निरीक्षक असलेल्या जेम्स होर्नेल या सागरी जैवशास्त्रज्ञाकडून ओखामंडलाच्या समुद्र किनारपट्टीचा अभ्यास केला गेला होर्नेल यांनी ओखामंडलच्या खाडीत मोती सापडण्याची शक्यता तपासून पाहिली. त्यांनी त्यांच्या सर्वेक्षणाचा अहवाल १९०९ साली सादर केला. या अहवालात त्यांनी ओखामंडल तालुक्यात मासेमारी व्यवसायाच्या विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास / १२