पान:महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१८९५-९६ मध्ये सर्वेक्षण अहवाल सादर केला. या समितीने पारंपरिक हस्तोद्योग बंद पडत असल्याचे निरीक्षण नोंदवले. या अहवालानंतर काही तालुक्यांच्या ठिकाणी कलाभवनच्या शाखा तांत्रिक शिक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आल्या. परंतु जनतेचे योग्य सहकार्य न मिळाल्यामुळे या शाखा पुढील काही वर्षात बंद पडल्या.
६) आर्थिक व सामाजिक चौकशी

 १९१४ मध्ये सयाजीरावांनी विभागात काम करणाऱ्या ५०० कर्मचाऱ्यांचे सामाजिक सर्वेक्षण करून घेतले. या सर्वेक्षणाचा अहवाल त्याच वर्षी प्रकाशित करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात सयाजीरावांनी ठरावीक खेड्यातील जनतेच्या आर्थिक स्थितीचे ठरावीक अंतराने सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला. त्यानुसार पेटलाड तालुक्यातील खेडे निवडून त्या खेड्याचे संपूर्ण आर्थिक सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वसाधारण आर्थिक सर्वेक्षणाबरोबरच पेटलाड, बिलिमोरा, दाभोई, बडोदा यासारख्या शहरांचे औद्योगिक सर्वेक्षणदेखील करण्यात आले. या औद्योगिक सर्वेक्षणातून त्या त्या शहरातील स्थानिक उद्योगांच्या गरजा सरकारच्या समोर आल्या. त्यामुळे स्थानिक उद्योगांच्या विकासासाठी या सर्वेक्षणाचा महत्त्वपूर्ण उपयोग झाला. ओखामंडल तालुक्याचेदेखील सर्वसाधारण सर्वेक्षण करण्यात आले.

महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास / ११