पान:महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव आणि
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद

 पारंपारिक भारतीय समाजव्यवस्थेत स्वतःला उच्चवर्णीय समजणारी मराठा जात नेहमीच राजकीयदृष्ट्या प्रभावशाली राहिली. राजकीय सत्ता गाजवणाऱ्या मराठा जातीने स्वत: च्या शैक्षणिक उन्नतीकडे मात्र विशेष लक्ष दिले नाही. पारंपरिक समाजरचनेबरोबरच मराठा जातीची शिक्षणाबाबतची अनास्था यासाठी मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरली. ब्रिटिश राजवटीमध्ये सुरू झालेल्या औपचारिक शिक्षणव्यवस्थेचा फायदा उठवत मराठा जातीतील काही व्यक्ती 'साक्षर' झाल्या. या 'साक्षर' व्यक्तींना राजाश्रय देत मराठा जातीच्या शैक्षणिक साक्षरतेचा 'महाप्रकल्प' बडोद्याच्या महाराजा सयाजीरावांनी आपल्या कारकिर्दीत राबवला. विशेष बाब म्हणजे सयाजीरावांच्या या महाप्रकल्पाचा सर्वाधिक लाभ मराठा जातीला झाला. १९०७ मध्ये स्थापन झालेली 'अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद' हा या महाप्रकल्पाच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा होता.

महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद / ६