पान:महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झाले होते. बिर्जे व लोखंडे यांच्या लिखाणावरील विविध व्यक्तींच्या प्रतिक्रिया प्रसिद्ध करून दीनबंधूने मराठा जातीतील जागृतीस प्रोत्साहन दिले.

 या प्रक्रियेत ‘बडोदा वत्सल'नेही महत्त्वाची भूमिका बजावली. वर्तमानपत्रातील या लेखांच्या वाचनाने पुढारी व हितचिंतक लोकांत परिषदेची स्थापना आणि परिषद कशी भरवावी याविषयी चर्चा होत असे. दरम्यान सत्यशोधक समाजातील नाशास्त्री बाबाजी महागट, कुलकर्णी व पानसरे यांनी एक शिक्षण परिषद भरवण्याचा उद्देश जाहीर करून हस्तपत्रक प्रसिद्ध केले. या पत्रकात सयाजीराव महाराजांना परिषदेचे अध्यक्षस्थान स्वीकारण्याची विनंती करण्यात आली होती. पण या कामी इतर पुढाऱ्यांनी विशेष आस्था न दाखवल्याने परिषद भरवण्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. पुढे १९०३ मध्ये मुंबईतील मराठा जातीतील व्यक्तींनी मराठा शिक्षण परिषद भरवण्याच्या उद्देशाने एका समितीची स्थापना केली. १९०४ मध्ये रामचंद्रराव वंडेकर यांनीदेखील मराठा शिक्षण परिषद भरवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु याही वेळेस काही कारणास्तव मराठा शिक्षण परिषदेची बैठक होऊ शकली नाही.

मुंबईच्या मराठा समाजाचे मानपत्र

 नोव्हेंबर १९०६ मध्ये सयाजीराव महाराज परदेशवारीहून परतल्यानंतर क्षत्रिय मराठा समाजाच्या वतीने मुंबईतील मराठा रहिवाशांनी महाराजांना मानपत्र दिले. या मानपत्रात मराठा

महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद / ११